आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज
स्वच्छतेसाठी १५४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज
मुख्याधिकारी- महेश रोकडे
स्वच्छतेसाठी १५४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पंढरपूर (दि.०१):- आषाढी शुद्ध एकादशी ०६ जूलै २०२५ रोजी होणार असून, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट ,६५ एकर परिसर ,पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास १५४२ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये नगरपरिषद पंढरपूर चे ३४८ कायम कर्मचारी तर जवळपास १००० हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत १९४ कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.
प्रशासनामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नदी पात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर व इतर विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यात येणार आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे.
शहरासह ६५ एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह ,मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या ,कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी, जेटींग आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील. दररोज ५५ ते १२० टन इतका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात शहरातील व उपनगरातील सर्व मैदाने, नदी परिसर, ६५ एकर, पत्राशेड दर्शनबारी रोजचे रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली
यात्रेकरुंच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडुन ६५ एकर, नदी पात्र, पत्राशेड, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे . त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट, ६५ एकर परिसर, रेल्वे मैदान या ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येणार आहेत. तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी पाण्याच्या टिपा ठेऊन त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यासह प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. तसेच नदीपात्रात व घाटावर अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नदीपात्रात १३ हायमास्ट पॉइंट्स, घाटांवर २०० वॅटचे एलईडी दिवे चालू करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयातही लाईटची व्यवस्था करण्यात येत आहेत. शहरात वारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे चौक, विसावा, भाई राऊळ चौक, कॉलेज चौक, संत गाडगे बाबा चौक, ६५ एकर इत्यादी ठिकाणी सौंदर्यीकरण कलाकृती उभारण्यात येत आहेत. यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांनी शौचालयाचा वापर करावा, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मुख्याधिकारी श्री. रोकडे यांनी यावेळी केले आहे.